देशाने जगाला ‘योग’ ही अनमोल देणगी दिली आहे-आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:00 AM2018-06-22T05:00:35+5:302018-06-22T05:00:35+5:30
योग हे माणसाला आरोग्यपूर्ण जीवन देणारे शास्त्र आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे.
मुंबई : योग हे माणसाला आरोग्यपूर्ण जीवन देणारे शास्त्र आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाने जगाला योग ही अनमोल देणगी दिलेली आहे. त्यामुळे त्यावर अभिमान बाळगला पाहिजे, असेरिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. चौथ्या जागतिक योगदिनानिमित्त सांताक्रुझ पूर्वकडील प्रभात कॉलनी येथील योगा इन्स्टिट्यूटमध्ये योग दिन साजरा झाला. या वेळी आठवले आपल्या खास शैलीत म्हणाले की, ‘रोज करा योग, दूर पळतील तुमचे रोग’ अशी चारोळी सादर करून योगाचे महत्त्व सांगितले. तथागत गौतम बुद्धांच्या काळापासून योग, ध्यानधारणांची सुरुवात झाली. आपल्या देशातील योग प्रकार संपूर्ण जगाने स्वीकारला आहे, ही आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याचे आठवले म्हणाले. त्यामुळे मन आणि शरीराला एकत्रित संतुलित ठेवून शरीर मनाला सदृढ करणारे शास्त्र म्हणजे योग आहे. शरीरातून रोग दूर करणारे निरोगी उत्साही जीवनासाठी योग महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी योगा इन्स्टिट्यूटच्या प्रमुख सीतादेवी योगेंद्र, योगाचे शिक्षक अभिषेक खुराणा उपस्थित होते.