लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय तिरंगा झेंड्याखाली सारा देश एकत्र आला. स्वातंत्र्य, लोकशाही आपण मिळवली. तेव्हा तिरंगा हीच आपली खरी शक्ती आहे. मात्र, बदलत्या गढूळ राजकारणामुळे देश मागे पडत चालला आहे. राज्यही मागे पडू लागले आहे, असे मत माजी मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आदित्य यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सरचिटणीस गोविंद मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आज जाती- जातीमध्ये, धर्मा- धर्मात वाद निर्माण केला जात आहे; पण सर्व देशवासीयांना ठाऊक आहे, या देशाला शूरवीरांच्या त्याग आणि बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे. हिंदुस्थानच्या अखंडतेसाठी आत्मबलिदान देणाऱ्या वीरांचा त्याग ते कदापि वाया जाऊ देणार नाही, असे सांगून आदित्य म्हणाले, गिरणी कामगार देशाचा कणा आहे आणि हीच मुंबईची खरी ओळख आहे. हुकूमशाही काय असते, हे येथील नागरिक ओळखून आहेत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.