देशभरात पडला १०१ टक्के पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:07 AM2019-09-07T06:07:27+5:302019-09-07T10:53:00+5:30
राज्यात सरासरीच्या तुलनेत २५ टक्के अधिक
मुंबई : मुंबईसह लगतच्या परिसराला पाऊस झोडपून काढत असतानाच ५ सप्टेंबरपर्यंत देशभरात तब्बल १०१ टक्के पावसाची नोंद झाली. दुसरीकडे बुधवारी मुंबईत धुमाकूळ घातलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी गुरुवारी रात्रभर पडलेल्या पावसाची नोंद ७१.८ मिलीमीटर एवढी झाली असून, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
१ जून ते ६ सप्टेंबर २०१९ दरम्यान देशात पडलेल्या पावसाची ही आकडेवारी आहे. महाराष्ट्रात यंदा उत्तम पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद २५ टक्के अधिक आहे. त्याखालोखाल कर्नाटक, गुजरातसह वाळवंटासारख्या राजस्थानात अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. गोवा, दादरा-नगर हवेली, लक्षद्वीप, अंदमान-निकोबारमध्येही अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश तसेच मिझोराम या राज्यांत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हरयाणा, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मेघालय आणि नागालँडमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे.
१ जून ते ६ सप्टेंबर दरम्यानचा पाऊस
दादरा-नगर हवेली ३०४५.३
गोवा ३५८१.२
अंदमान-निकोबार १८९४.५
लक्षद्वीप ११२८.३
महाराष्ट्र १०९२.२
कर्नाटक ८६७.७
गुजरात ७५७.६
राजस्थान ४९८.८
मुंबईत १८ ठिकाणी शॉर्टसर्किट
मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या २४ तासांत १० ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. १६ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या.
पावसाची नोंद
कुलाबा - ७१.८ मिमी
सांताक्रूझ - ४५.१ मिमी
शहर - ५६ मिमी
पूर्व उपनगर - ६० मिमी
पश्चिम उपनगर - ३९ मिमी