काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज; संजय राऊतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:44 AM2021-05-30T10:44:51+5:302021-05-30T10:46:03+5:30
Sanjay Raut: केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या आजरवच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे.
Sanjay Raut: केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या आजरवच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देश काँग्रेसच्याच पुण्याईवर तरला आहे असं सांगताना राऊत यांनी मोदी सरकारला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. गेली दोन वर्ष तर कोरोनामध्येच गेली. पण आपण जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की नेहरुंपासून ते अगदी मनमोहन सिंग यांच्यापर्यंत देश काँग्रसेच्याच पुण्याईवर चालतोय. काँग्रेसनं राबवलेल्या योजना आजही आपण पाहत आहोत. त्यामुळे मोदी सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि आणखी मेहनत घेण्याची गरज आहे", असं संजय राऊत म्हणाले.
जनतेला अदानी, अंबानी व्हायचं नाहीय
"केंद्रात गेल्या सात वर्षांपासून मोदींचं सरकार आहे पण अनेक कामं प्रलंबित आहेत. देशातील जनतेच्या अपेक्षा काही जास्त नाहीत. त्यांना अदानी, अंबानी, टाटा, बिरला व्हायचं नाहीय. रोजगार, शिक्षण, उद्योग आणि शेती हेच त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत", असंही संजय राऊत म्हणाले.
ममता बॅनर्जींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
भाजपचं शासन नसलेल्या राज्यांना दुजाभाव मिळत असल्याच्या प्रश्नावर बोलत असताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार हे राज्यांचे पालक आहेत आणि पालक मुलांसोबत कधी भेदभाव करू शकत नाही हे केंद्रानं समजून घ्यायला हवं. ममता बॅनर्जींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गुजरातप्रमाणे इतर राज्यांना न्याय का मिळत नाही? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.