जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित : राज्यपाल कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:08+5:302021-07-27T04:06:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, ...

The country is safe only because of the bravery of the soldiers and the courage of the heroic mothers: Governor Koshyari | जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित : राज्यपाल कोश्यारी

जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित : राज्यपाल कोश्यारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, असे सांगताना देशाचे शूरवीर जवान व अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, अशी भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी व्यक्त केली.

कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य कारगिल संघर्ष’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपाल म्हणाले की, भारताला शांतता हवी असली तरीही शत्रू राष्ट्रांनी देशाला वेढले आहे ही वस्तुस्थिती विसरता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. सीमावर्ती भागात चांगले रस्ते, सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले आहेत.

विद्यार्थी दशेत असल्यापासून देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले पाहिले. खुद्द आपल्या २२ वर्षीय बहिणीचे पती १९६२ च्या युद्धात शहीद झाले होते, असे राज्यपालांनी सांगितले. कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली, असे सांगून डोकलाम व गलवान या ठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते महावीर चक्र विजेते हवालदार दिगेन्द्र सिंह, हवालदार दीप चंद, घातक पलटणचे हवालदार मधुसूदन सुर्वे, हवालदार पांडुरंग आंब्रे व हवालदार दत्ता चव्हाण, स्क्वाड्रन लीडर राहुल दुबे, कॅप्टन रूपेश कोहली, कॅप्टन विद्या रत्नपारखी, सविता दोंदे, कर्नल सुशांत गोखले यांच्या आई रोहिणी आनंद गोखले व कर्नल संदीप लोलेकर यांच्या भगिनी कोमल शहाणे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी कारगिल युद्धविषयक चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, अनुराधा गोरे व मुंबई प्रभागाचे प्रमुख एअर व्हाइस मार्शल एस. आर. सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मुंबई व लोढा फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हर्शल कंसारा यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The country is safe only because of the bravery of the soldiers and the courage of the heroic mothers: Governor Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.