''हा देश, ही माती आमची; हुकूमशहा मोदी सरकारचा अंत हिटलरसारखा''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 06:10 AM2019-12-20T06:10:44+5:302019-12-20T06:10:56+5:30
आॅगस्ट क्रांती मैदानात घुमला आंदोलकांचा आवाज; सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत डावे पक्ष व पुरोगामी संघटनासह विद्यार्थ्यांनी गुरुवारी ग्रॅण्ट रोड येथील आॅगस्ट क्रांती मैदानात आंदोलन केले. हा देश, ही माती आमची आहे, हुकूमशाह मोदी सरकारचा अंत हिटलरसारखा होईल, अशी घोषणाबाजी या वेळी आंदोलकांनी केली. या कायद्याला आमचा कायमच विरोध राहील, असे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
मैदानात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भाषणे केली जात असतानाच विद्यार्थ्यांनीही गाण्यातून या कायद्याचा विरोध केला. डाव्या चळवळीचे नेते प्रकाश रेड्डी म्हणाले, आम्ही मोदी सरकारला धडा शिकवू. काहीही झाले तरी आमचा लढा सुरूच राहील. देशात हिटलरशाही सुरूअसली तरी, एक लक्षात घ्यावे ते म्हणजे हिटलरलाही आत्महत्या करावी लागली होती. हिटलरसारखे वागलात तर हिटलरसारखे मराल.
अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे कर्तव्य - वर्षा विद्या विलास
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास म्हणाल्या, ज्या गोष्टींनी, ज्या घटकांनी आपले स्वातंत्र्य हिरावले जात असेल, हक्कांना बाधा पोहोचत असेल, अन्याय होत असेल; अशा प्रत्येक गोष्टीविरोधात आम्ही आवाज उठवित आहोत. अन्यायाविरोधात आवाज उठविणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही बजावणारच.
नागरिकांच्या हक्काला बाधा पोहोचू नये - फरहान अख्तर
अभिनेता फरहान अख्तर यांनीदेखील आंदोलनात सहभाग नोंदविला. ते म्हणाले, लोकशाहीत नागरिकांच्या हक्कांना बाधा पोहोचू नये; हे आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्या हक्कांसाठी ते आवाज उठवित आहेत, हे आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
‘तुम्हारी लाठी से तेज हमारी आवाज है’
‘आवाज दो, हम एक है...’, ‘लढेंगे... जितेंगे...’, ‘हम भारत के लोग...’, ‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी...’, ‘मोदी-शाहा, तानाशाहा तानाशाहा...’, ‘हम सब भारतीय नागरिक है...’, ‘तुम्हारी लाठी से तेज हमारी आवाज है...’, ‘प्यार बांटो, देश नही...’ अशा घोषणा देत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात डावे पक्ष व पुरोगामी संघटनांसह विद्यार्थ्यांनी गुरुवारी ग्रॅण्ट रोड येथील आॅगस्ट क्रांती मैदानात आंदोलन केले. आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता.
हिंदुस्थान कोणाच्या बापाचा नाही - जावेद जाफरी
अभिनेता जावेद जाफरी यांनी सांगितले की, सर्वांचे रक्त इथल्याच मातीचे आहे. कोणाच्या बापाचा हिंदुस्थान नाही, असे म्हणत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल बोस, हुमा कुरेशी, ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
देशाची फाळणी होऊ देणार नाही - स्वरा भास्कर
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सांगितले की, हा महात्मा गांधीजींचा भारत आहे. हा शहीद भगतसिंग यांचा भारत आहे. आम्ही देशाची फाळणी होऊ देणार नाही. संविधानाच्या मूल्यांसाठी काढलेली ही रॅली आहे. प्रत्येक नागरिक आंदोलनात सहभागी झाला. आपण सर्व एक आहोत, हे आपण दाखवून दिले.
अल्पसंख्याकासह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग
आंदोलकांमध्ये अल्पसंख्याक समुदायासह विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. कामगारांसह महिलाही मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. काही लहान मुलांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी हातात घेतलेल्या बॅनरवर या कायद्यास विरोध दर्शवितानाच या देशात हुकूमशाही चालणार नाही, असा संदेश दिला.
पोलिसांकडून कसून तपासणी
च्स्कायवॉकपासून मैदानाच्या प्रवेशद्वारापर्यंत ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. प्रवेशद्वारापासून मैदानात दाखल होईपर्यंत प्रत्येक आंदोलकाची कसून तपासणी केली जात होती.
च्दुपारी चार वाजेपर्यंत मैदानापासून प्रवेशद्वारापर्यंत आणि प्रवेशद्वारापासून स्कायवॉकपर्यंतचा प्रत्येक कोपरा आंदोलकांनी व्यापून गेला.
च्सायंकाळी पाच वाजेपर्यंत मैदान आंदोलकांनी संपूर्णत: भरून गेले. विशेषत: प्रवेशद्वारापासून स्कायवॉकच्या रस्त्यापर्यंतचा प्रत्येक कोपरा आंदोलकांनी व्यापून टाकला. सायंकाळचे सात वाजल्यानंतर तर मैदान, प्रवेशद्वार, रस्ते आणि परिसरात फक्त आणि फक्त आंदोलकच निदर्शनास येत होते, एवढी प्रचंड गर्दी होती.