पतंप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न दाखवलं असून जागतिक स्तरावर भारताची मोठी प्रगती होत असल्याचं म्हटलं आहे. त्या अनुषंगाने सातत्याने रोजगार निर्मित्ती आणि पायभूत सुविधांच्या माध्यमातून विकास होत असल्याच दावाही मोदी सरकारकडून करण्यात येतो. मात्र, देशातील बेरोजगारी दरात वाढ झाली असून गत वर्षात बेरोजगारी दराने उच्चांक गाठल्याचे एका सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, भाजपकडून होत असलेला दावा खोटा ठरतोय, असेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेसारख्या इतर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ८% ते ९% च्या तुलनेत भारतात लॉजिस्टिक खर्च सकल देशांतर्गत उत्पादनाच्या १३% ते १४% इतका जास्त आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकीर यांनी एका कार्यक्रमात दिली होती. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमिचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी म्हटले होते. तर, पंतप्रधान मोदी हेही सातत्याने जाहीर कार्यक्रमांतून आणि सभांमधून भारत २०२५ मध्ये ५ ट्रिलियन इकॉनॉमिचे स्वप्न साकार करेल, असा दावा करताना दिसून येतात.
एकीकडे ५ ट्रिलियन इकॉनॉमिचा दावा केला जात असताना दुसरीकडे देशातील बेरोजारीचा दर वाढला आहे. त्यावरुन, जयंत पाटील यांनी मोदी सरकार व भाजपला लक्ष्य केलं आहे. ''एकीकडे देशात वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचारात आकंठ बुडाले आहेत, दुसरीकडे मात्र भारतातील बेरोजगारी देखील शिगेला पोहचली असून देशातील युवा बेरोजगारीच्या नैराश्यात आकंठ बुडाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इकोनॉमीच्या नुकत्याच प्रसिद्ध अहवालानुसार देशातील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे १०.९ टक्क्यांवर पोहोचला आहे'', अशी माहिती पाटील यांनी दिली.
एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र बेरोजगारी देखील वाढत आहे. हे चित्र विरोधाभासी आहे. बेरोजगारी वाढत असल्याने देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा केंद्र सरकार व भाजपा नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरत आहे, असे पाटील यांनी म्हटले. पाटील यांनी भाजपवर थेट हल्लाबोल करत देशातील बेरोजगारीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.