मुंबई : २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मुंबईतील कामांचा शुभारंभ करण्यात आला असून, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सुमारे १०० लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. याचा मोठा लाभ मुंबईसह राज्यातील इतर शहरांना मिळेल. राज्यात सध्या फक्त ११ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क आहे. २०२४ पर्यंत हे नेटवर्क ३२५ किमीपेक्षा अधिक असेल. आज जितके लोक उपनगरीय लोकल रेल्वेतून प्रवास करतात तितकेच मुंबईत मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वेतून प्रवास करू शकतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन नवीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ११ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉक येथील कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये दाखल झाले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी ‘नमस्कार मुंबईकर’ असे म्हणत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर केला. भाषणास सुरुवात करतानाच त्यांनी उपस्थितांना मराठीतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मुंबई व महाराष्ट्रातील लोकांचे सहकार्य, सोबत मला नेहमीच आनंददायी वाटते. मी रशियात असतानाही मुंबईतील पूर परिस्थितीची माहिती मला मिळत होती. विपरीत परिस्थितीत यश कसे मिळवायचे हे इस्रोच्या वैज्ञानिकांकडून शिकू शकतो, असेही ते म्हणाले.
मेट्रोच्या कामातून साधारण १० हजार अभियंते आणि कुशल-अकुशल अशा साधारण ४० हजार जणांना रोजगार मिळेल. राज्यातील पायाभूत सुविधांच्या सर्व प्रकल्पांना जलदगतीने मान्यता देण्यात आली आहे. अनेक वर्षे रखडलेला नवी मुंबई विमानतळ प्रकल्प, ट्रान्स हार्बर प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतिमान झाले आहेत. आज देशात २७ शहरांत मेट्रो सुरू झाली आहे किंवा सुरू होत आहे. देशात ६७५ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत. ४०० किलोमीटरची मेट्रो सेवा मागील पाच वर्षांत सुरू झाली आहे. मागील पाच वर्षांत ६०० किलोमीटरच्या मेट्रो मार्गांना मान्यता देण्यात आली आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
भारताची ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचालआपला देश आता ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशातील पायाभूत सुविधाही आता त्याच दर्जाच्या असणे गरजेच्या आहेत. त्यामुळेच पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर मोठा भर दिला जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.जलस्रोत करू या प्लॅस्टिकमुक्त समुद्र तसेच मिठी नदीसह इतर जलस्रोतही प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी संकल्प करावा. त्यामुळे देश प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
बचतगटातील महिलांना १ लाखाचे बिनव्याजी कर्जऔरंगाबाद : बचतगटाच्या चळवळीमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच देशाची शक्ती वाढत आहे. ही चळवळ बळकट करायची आहे. त्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील प्रत्येक महिलेला एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. जनधन बँक खाते असणाऱ्या बचतगटांना बँक खात्यात पैसे नसताना ५ हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट काढता येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली.