देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:19 PM2024-02-14T18:19:08+5:302024-02-14T18:19:44+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे याबाबत आज महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि बिव्हीजी - भारत विकास ग्रुप यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या करारप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा,उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरू डॉ. अपूर्वा पालकर, भारत विकास ग्रुप- बिव्हीजीचे हणमंत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप दिले आहे. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे हे लक्षात घेऊन राज्यात स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांना प्रशिक्षण देने, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अकादमी मध्ये विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात येणार असून या संदर्भातील विविध अभ्यासक्रमांना व प्रमाणपत्रे, पदविका व पदवी अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुप संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अकादमीमध्ये विविध अभ्यासक्रम राबविणार आहे.