मुंबई : कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाउनमुळे पतीपत्नी २४ तास चार भिंतीआड अडकले. त्यामुळे काहींचा संसार फुलला तर, काही पती-पत्नींमध्ये वाद वाढून विकोपाला गेला. अशात अनेकांनी थेट घटस्फोटापर्यंत जाण्याचे पाऊल उचलले. मात्र या कठीण काळात मुंबई पोलिसांच्या महिला अत्याचार विरोधी कक्षाने अनेकांच्या संसाराची विस्कटकेली घडी पुन्हा व्यवस्थित केली आहे. यामध्ये प्रेम विवाहाबरोबर अरेंज मॅरेजमधील जोडप्यांचाही समावेश आहे.
लॉकडाउनमध्ये अनेकांचे उद्योगधंदे बुडाले, नोकऱ्या गेल्या तर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली. लॉकडाउन काळात सगळ्यांना आपल्या मनाविरुद्ध घरात राहणे भाग पडले होते. या काळात कधी नाही तो इतका वेळ पती-पत्नींनी एकत्र घालविला. कुठे संवादामुळे नात्यातला गोडवा वाढला. तर कुठे याच एकत्रपणामुळे अनैतिक संबंधांचे बिंग फुटले आणि यातून निर्माण झालेले वाद पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचले.
तर दुसरीकडे, छोटी छोटी कारणेही वाद होण्यास पुरेशी ठरू लागली. आणि काही ठिकाणी महिलांवरील मानसिक, शारीरिक अत्याचार वाढले. अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी पोलिसांचे महिला अत्याचार विरोधी कक्ष, महिला सहाय कक्ष कार्यरत आहेत. आतापर्यंत पोलिसांमुळे शेकडो जणांचे प्राण वाचले आहेत.
ही आहेत कारणे...
आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रासासोबतच विवाहबाह्य संबंध, एकत्र कुटुंब पद्धत, सासरच्या मंडळीकड़ून छळ हुंड्याची मागणी ही प्रमुख कारणे आहेत. कोरोनाच्या काळात क्षुल्लक वादही घटस्फोटापर्यंत पोहचले.
तडजोडीनंतरही पथकाचा वॉचएका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची पतीसंदर्भातील लेखी तक्रार येताच, सर्वात आधी तिची बाजू, परिस्थिती समजून घेतली जाते. पुढे, पती-पत्नीची बाजू ऐकून समजून घेतो. दोघांना विश्वासात घेऊन त्यांना कुटुंब जबाबदारी, मुले, सामजिक भान यांची माहिती करून समुपदेशन केले जाते.दोघांमध्ये तडजोड पथक महिलेची चौकशी करून सगळे योग्य सुरू आहे की नाही याची विचारपूस करते. तर ज्या प्रकरणात समुपदेशन करूनही दोघांनाही एकत्र राहायचे नसेल तर अशावेळी पुढील कारवाईसाठी ती प्रकरणे संबंधितांकडे पाठविली जातात.