संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार नवी सिंहांची जोडी
By admin | Published: July 6, 2017 07:10 AM2017-07-06T07:10:38+5:302017-07-06T07:10:38+5:30
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंहांची संख्या कमी झालेली असून, याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. सध्या नॅशनल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंहांची संख्या कमी झालेली असून, याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. सध्या नॅशनल पार्कातील लायन्स सफारीची सारी भिस्त ‘रवींद्र’, ‘जसपाल’ या दोन नर आणि ‘रूपा’ या सिंहिणीवर आहे. यावर उपाय म्हणून वनविभागाने कर्नाटकातून एक सिंहांची जोडी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील बनेरगट्टा या प्राणिसंग्रहालयातून ही सिंहांची जोडी आणण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांना नव्या सिंहांच्या जोडीचे दर्शन घडणार आहे. नॅशनल पार्कातील तीन रानटी मांजरांच्या बदल्यात सिंहांची ही जोडी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, नॅशनल पार्कातील रवींद्र या सिंहाचे वय १२ वर्षे आहे. तर, जसपाल आणि रूपा सहा वर्षांचे आहेत. या सिंहांना रोज नऊ
किलो मांस दिले जाते. मात्र
त्यांचे वजन प्रमाणाबाहेर वाढू नये यासाठी गुरुवारी त्यांना खाद्य दिले जात नाही.
कर्नाटकातून मुंबईत येणाऱ्या सिंहांसाठी नवीन पिंजरे तयार करण्यात आले आहेत. नव्या जोडीविषयी अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. कर्नाटक सरकार कोणती जोडी देणार, याचाही निर्णय झालेला नाही. मात्र, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.