आठ कोटींचे दागिने चोरणाऱ्या जोडप्याला धारावीतून अटक

By admin | Published: June 21, 2017 04:01 AM2017-06-21T04:01:20+5:302017-06-21T04:01:20+5:30

हैदराबादमधील मुथ्थुट फायनान्समध्ये सीबीआय आॅफिसर असल्याचे भासवून सुमारे ८ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह त्याच्या पत्नीला रविवारी

The couple stole eight crores of jewelery from Dharavi | आठ कोटींचे दागिने चोरणाऱ्या जोडप्याला धारावीतून अटक

आठ कोटींचे दागिने चोरणाऱ्या जोडप्याला धारावीतून अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हैदराबादमधील मुथ्थुट फायनान्समध्ये सीबीआय आॅफिसर असल्याचे भासवून सुमारे ८ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह त्याच्या पत्नीला रविवारी रात्री उशिराने मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली आहे. सुंदर राजरत्नम कंगाल्ला आणि पत्नी राधा अशी अटक आरोपींची नावे आहेत.
तेलंगणा पोलिसांना सुंदर धारावीत असल्याची माहिती मिळाली. गेल्या दोन महिन्यांपासून तेलंगणा पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र पोलीस येण्याची माहिती लागताच तो पसार होत असे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५च्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी सुरुवातीला तो राहत असलेल्या परिसरावर नजर ठेवली. तो तेथेच असल्याची खात्री पटताच काही महिला पोलिसांना त्याच्या घरी धाडले. त्याने दरवाजा उघडताच त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत पत्नी राधा ही चुनाभट्टी येथील फ्लॅटमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तेथून तिला अटक करण्यात आली.
त्यांनी २.२५ किलो सोने जप्त केले आहे. चोरी केलेल्या सोन्याच्या पैशांतून ते नातेवाइकांसोबत मंगळूर, बंगळुरू, केरळ आणि गोवामध्ये फिरून आले. सुंदर हा मोबाइल फोन जास्त वापरत नव्हता. एखादा कॉल आल्यास तो मोबाइल बंद करत असे, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड होई.
डिसेंबर महिन्यात हैदराबादमधील मुथ्थुट फायनान्समध्ये सुंदरने अन्य सहा जणांच्या मदतीने सीबीआय आॅफिसर बनून ८ कोटी किमतीच्या ४६ किलो सोन्यावर डल्ला मारला. या वेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. यातून मिळालेल्या विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या टोळीतील लक्ष्मण नारायण मुधंग, गणेश भोसले उर्फ पाटील, सुभाष पुजारी पाण्डे, काला उर्फ लंबू आणि तुकाराम गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडून ३.५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरला धारावीतून निवडणूक लढवायची होती. यासाठी त्याला निधीची गरज होती. यासाठी त्याने तुरुंगातील कैद्यांच्या मदतीने लुटीचा कट आखल्याचे तपासात समोर आले.
सुंदर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. त्याला दरोड्याच्या दोन गुन्ह्यांत सत्र न्यायालयाने दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याला उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. त्यानंतर त्याने डिसेंबर महिन्यात ही लूट केली. दोघांनाही तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: The couple stole eight crores of jewelery from Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.