कतारहून कन्येसह मुंबईत दाखल; एनसीबीच्या पाठपुराव्याला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लग्नानंतर कतारमध्ये फिरण्यासाठी गेले असताना अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अडकलेले मुंबईतील जोडपे अखेर दोन वर्षांनी मायदेशी परतले. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्याने ओनिबा आणि महंमद शरीक कुरेशी हे दाम्पत्य आपल्या लहानग्या कन्येसह बुधवारी रात्री कतार एअरवेजने मुंबई विमानतळावर परतले. कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्यांना क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) केलेल्या पाठपुराव्यामुळे दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा रद्द होऊन कुरेशी दाम्पत्याला पवित्र रमजान महिन्याची अनोखी भेट मिळाली आहे. पहिल्या रोजाच्या दिनी त्यांना आपल्या मातृभूमीचे दर्शन घेता आले.
मुंबईतील महंमद शरीक कुरेशी आणि ओनिबा कुरेशी हे दाम्पत्य २०१९मध्ये कतारमध्ये हनिमूनसाठी गेले होते. त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना फिरण्यासाठी पॅकेज दिले होते. त्याचबरोबर त्यांच्या सामानातून चार किलोचे पाकीट दिले होते. यात तंबाखू असून, ताे कतारमधील एका मित्राला द्यायला सांगितले होते. प्रत्यक्षात त्यात बंदी असलेले हशिश हाेते. कतारमध्ये तेथील पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. स्थानिक कोर्टाने त्यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, ओनिबा या गर्भवती राहिल्या. पुढे त्यांनी तुरुंगातच मुलीला जन्म दिला.
गेल्यावर्षी या दाम्पत्याने भारतातील एनसीबीला पत्र लिहून घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या गुन्ह्यातून सुटका करण्याची विनंती केली. ओनिबा यांचे वडील शकील अहमद कुरेशी यांच्या माध्यमातून हा पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक केपीएस मल्होत्रा यांनी त्यांच्या म्हणण्याबाबत सर्व खातरजमा केली. त्यांच्या नातेवाईकाच्या विरोधात सर्व पुरावे गोळा केले. कतारचा दूतावास आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. कतारच्या राजदूतांशी चर्चा केली. त्यानंतर या दाम्पत्याला कतारच्या सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यास सांगण्यात आले आणि त्याठिकाणी त्यांच्या सुटकेवर ३ फेब्रुवारीला शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर कुरेशी दाम्पत्य आपल्या चिमुकल्या कन्येसह बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर पोहोचले.