डोंबिवली/ मुंब्रा : मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील कसाऱ्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यांचे कपलिंग तुटल्याने ते वेगळे होण्याची घटना रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी या मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक टाळण्याकरिता मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. जलद मार्गावरील वाहतूक सकाळीच ठप्प झाल्याने ही वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली. जलद मार्गावरून धावणाऱ्या तीन लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. भरपावसात त्यांना पायपीट करून जवळचे रेल्वे स्थानक गाठून धिम्या लोकलने पुढील प्रवास करावा लागला. त्यातच, रविवारी धिम्या मार्गावरही मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाला कधी नव्हे ती सुबुद्धी सुचली व त्यांनी हा मेगाब्लॉक रद्द केला.पारसिक बोगद्याच्या वरील भागातील आवार भिंत काही दिवसांपूर्वी खचल्याने, गेले काही दिवस या भागातून लोकलसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कपलिंग तुटून डबे वेगळे झाले, तरी जीवितहानी झालेली नाही. डबे एकमेकांपासून वेगळे होताच प्रवाशांनी घाबरून एकच आरडाओरडा केला. अनेक प्रवाशांनी अपघात पाहण्याकरिता रेल्वे मार्गावर उड्या ठोकून मोबाइलमध्ये फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याच वेळी सीएसटीकडून कल्याणच्या दिशेने लोकल येत होत्या. यामुळे अपघातस्थळी गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे पोलीस व अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातग्रस्त लोकलपाठोपाठ येणाऱ्या तीन जलद लोकल दिवा स्थानकादरम्यान खोळंबल्या. संततधार पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. रेल्वे प्रशासनाने घटनेनंतर अर्ध्या तासाने कल्याण दिशेकडील जलद वाहतूक सुरू केली. मात्र, सीएसटीकडील जलद मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत सुरू झाली नव्हती. कारण अपघात घडून दोन तास उलटल्यानंतर म्हणजे सव्वादहा वाजता कपलिंग दुरुस्तीचे काम सुरू झाले व ते १२ वाजता संपले.रेल्वे गाड्यांची देखभाल, दुरुस्ती यावर रविवारच्या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हीच घटना सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी घडली असती तर कदाचित भीतिपोटी दरवाजाला लटकलेल्या लोकांनी एकतर उड्या मारल्या असत्या किंवा काहीजण कपलिंग तुटल्याने हिसका बसून पडले असते. (प्रतिनिधी/वार्ताहर)