लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुरिअर कंपनीचे दहा लाख रुपये घेऊन त्यांचा चालक पसार झाला होता. सांताक्रुझ परिसरात हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.
सांताक्रुझच्या आशा पारेख रुग्णालयाजवळ हा प्रकार १९ ऑगस्ट, २०२१ रोजी घडला होता. पप्पू अवस्थी (४०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पायधुनी परिसरात असलेल्या कुरिअर कंपनीत तो चालक म्हणून काम करत होता. मालाडमधील शाखेत देण्यासाठी त्याच्या मालकाने त्याच्या सहकाऱ्याला १० लाख दिले होते. त्यानुसार ते देण्यासाठी ते मालाडला निघाले. सांताक्रुझ पश्चिम येथे पोहोचताच अवस्थी याने पैशांची बॅग हिसकावत पळ काढला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ३६ तासात त्याला उत्तर प्रदेशातील गोंडा येथून शोधून काढले.
त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. त्याने चोरलेली रक्कम देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. तो गेली चार वर्षे याठिकाणी काम करत होता. त्याने दिलेल्या आधारकार्डच्या मदतीने पोलिसांनी त्याला शोधले.