नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याच्या पत्नीला कोर्टाची सूचना; वाद सामंजस्याने मिटला तर चांगले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:58 AM2023-02-25T06:58:41+5:302023-02-25T06:59:11+5:30
मुलांसंदर्भातील वाद एकमेकांशी बोलून सोडवा, अशी सूचना न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सिद्दीकी व झैनबला केली.
मुंबई - मुलांचा ठावठिकाणा सांगण्याचे निर्देश घटस्फोटित पत्नीला द्यावेत, यासाठी बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस (हरवलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश) दाखल केली आहे. मात्र, न्यायालयाने सिद्दीकी व त्याची पत्नी झैनब यांना त्यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्याची सूचना केली.
मुलांसंदर्भातील वाद एकमेकांशी बोलून सोडवा, अशी सूचना न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सिद्दीकी व झैनबला केली. नवाजुद्दीनला केवळ मुलांची आणि त्यांच्या शिक्षणाची काळजी आहे. एकमेकांशी बोला, वडील आणि मुलांमधील संवाद व भेटीचे अधिकार निश्चित करा. वाद सामंजस्याने मिटला तर चांगले आहे, असे न्यायालयाने म्हटले.
मुलांच्या ठावठिकाणाबाबत सिद्दीकीला काहीच माहीत नाही. मुले दुबईला आहेत, असे सिद्दीकीला वाटत होते. मात्र, मुले शाळेत जात नसल्याचा मेल सिद्दीकीला शाळेतून आला, असे सिद्दीकीचे वकील प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले.