कोर्टाने रेल्वेला उपाय सुचविणे लज्जास्पद! महिला प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:46 AM2018-07-14T04:46:44+5:302018-07-14T04:47:03+5:30
उपनगरीय लोकलमधील महिला प्रवाशांच्या होणाऱ्या कुचंबणेची दखल अखेर न्याय प्रशासनाने घेतली. यामुळे लोकलमध्ये महिला बोगीसह प्रथम दर्जाच्या बोगी वाढवण्याच्या प्रवाशांच्या मागणीला यंदा थेट न्यायालयातून बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई - उपनगरीय लोकलमधील महिला प्रवाशांच्या होणाऱ्या कुचंबणेची दखल अखेर न्याय प्रशासनाने घेतली. यामुळे लोकलमध्ये महिला बोगीसह प्रथम दर्जाच्या बोगी वाढवण्याच्या प्रवाशांच्या मागणीला यंदा थेट न्यायालयातून बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. महिला प्रवाशांना सुविधा कशा द्याव्यात किंबहुना नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्याबाबत उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून रेल्वेला आदेश देण्याची वेळ आली आहे, ही रेल्वे प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे याबाबत म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून महिला प्रवाशांच्या प्रश्नावर रेल्वे प्रशासनाकडे वारंवार निवेदन आणि पत्रव्यवहार करण्यात येतो. मात्र, त्याचा काहीच फायदा होत नाही. याचा अर्थ रेल्वे महाव्यवस्थापक (जीएम), विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अशा पदांवरील अधिकारी यांच्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता नाही असा होतो. जर क्षमता नसेल तर या अधिकाºयांच्या जागी कार्यक्षम अधिकाºयांची नियुक्ती करावी.
द्वितीय दर्जाच्या महिला बोगी आणि प्रथम दर्जा बोगी वाढवण्याबाबत मागणी करण्यात येते. मात्र नेहमीप्रमाणे रेल्वेकडून त्याला ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावण्यात येतात. किमान यंदा न्यायालयाचा तरी आदर राखून रेल्वे प्रशासनाकडून प्रायोगिक स्तरावर प्रथम दर्जाच्या बोगीबाबत उपाययोजनेस सुरुवात होईल, अशी आशा असल्याची माहिती अरगडे यांनी दिली.
मध्य रेल्वेकडे प्रवाशांच्या अधिकृत आकडेवारीसाठी संपर्क साधला असता, प्रवाशांच्या सांख्यिकीची माहिती घेत असल्याचे सांगितले, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत सुमारे २३ टक्के महिला आणि ७७ टक्के पुरुष प्रवासी आहेत.
किमान प्रायोगिक तत्त्वावर तरी सुरू करा!
मुळात महिला प्रवाशांना वेळेत कार्यालयात पोहोचण्यासह घरातील अन्य जबाबदारी देखील पार पाडावी लागते. प्रथम दर्जाच्या बोगीसाठी स्वतंत्र बोगी असल्यास साहजिकच महिला प्रवाशांना फायदा होईल. गर्दीच्या वेळेमध्ये महिला प्रवाशांना किमान उभे राहण्यास तरी जागा उपलब्ध होईल. यामुळे रेल्वे प्रशासनाने किमान हा प्रयोग करायला हवा. रेल्वेने कारणे देण्यापेक्षा प्रत्यक्ष चाकोरीबाहेर विचार करणे आवश्यक आहे.
- वर्षा कोहली, सीएसएमटी-गोरेगाव (व्हाया दादर) प्रवासी
किमान ३ बोगींचा विचार करावा
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच १५ बोगींच्या लोकल धावणार आहेत. या वेळी प्रथम दर्जाच्या प्रवाशांसाठी किमान ३ बोगी राखीव ठेवणे गरजेचे आहे. पुरुष प्रवाशांप्रमाणे महिला प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. द्वितीय दर्जाच्या महिला प्रवाशांची संख्यादेखील वाढत असल्याने त्यांच्या बोगींच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे.
- रुपल गुणे, अंधेरी ते लोअर परळ, प्रवासी
प्रथम दर्जाची पूर्ण बोगी हवीच
होय, लोकलमध्ये प्रथम दर्जाची पूर्ण बोगी अत्यंत आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना प्रवास करणे अशक्य होते.
- विनीता वर्मा, मीरा रोड ते लोअर परळ, प्रवासी