Join us  

‘तो’ कॉन्स्टेबल अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात

By admin | Published: April 02, 2017 12:02 AM

बलात्कार व भू्रणहत्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पोलीस कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे

मुंबई : बलात्कार व भू्रणहत्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पोलीस कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सायन पोलिसांकडून याप्रकरणी तपासात होत असलेल्या दिरंगाईचा फायदा उठवीत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवर वरिष्ठांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ फेबु्रवारीला दिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आली. त्या वेळी तरुणीची वैद्यकीय तपासणी व सविस्तर जबाब आणि संबंधित सर्व पुरावे जमविले. तीन आठवड्यांनंतर त्यांच्या अहवालानुसार २४ मार्चला भोईवाडा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल तिऊरवडेविरुद्ध गुन्हा दाखल करून सायन पोलिसांकडे तपास देण्यात आला. मात्र आजतागायत तिऊरवडेला अटक करण्यात आलेले नाही. याबाबत वरिष्ठ निरीक्षक मृदुला लाड यांच्याकडे विचारणा केली असता या गुन्ह्यासंबंधी पुरावे शोधत आहोत, तिऊरवडेचा शोध सुरू आहे, असे सांगितले. मात्र तो नियुक्तीला असलेल्या सशस्त्र दल (एल ए) विभागाला कळविण्यात आले का, असे विचारल्यावर त्यांनी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे अधिक सांगू शकत नाही, असे सांगत माहिती देण्याचे टाळले. (प्रतिनिधी)