मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक केलेल्या गँगस्टर मयुर शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गँगस्टर कुमार पिल्लई टोळीसाठी काम करणाऱ्या चार शूटर्सपैकी एक असलेल्या मयुर शिंदे याच्याविरोधात भांडुपमध्ये २००० मध्ये घडलेल्या गुलाम हत्याकांडापासून ते भांडुपमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वैभव कोकाटे यांच्या कार्यालयावरील गोळीबारप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
तसेच मुलुंडमध्ये पोलिसाला मारहाण व कांजूरमार्गमध्ये ठेकेदाराला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याच्या गंभीर गुन्ह्यांसह खंडणी, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर यांना गुन्ह्यांची पोलिस अभिलेखी नोंद आहे.
याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुन्नाने दिलेल्या माहितीत, संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेतल्यामुळे त्यांना ती परत मिळावी, यासाठी शिंदेच्या सांगण्यावरून कॉल केल्याचे सांगितले होते. शिंदे हा १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत होता. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. कांजूरमार्ग पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.