जयश्री पाटील यांना न्यायालयाकडून दिलासा; २९ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:48 AM2022-04-19T10:48:34+5:302022-04-19T10:49:53+5:30
हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून, त्यात तपास सुरू आहे. त्यामुळे अर्जदाराला (जयश्री पाटील) दिलासा देऊ नये, असे म्हणत सरकारी वकिलांनी पाटील यांच्या जामीनवर आक्षेप घेतला. मूळ एफआयआरमध्ये पाटील यांचे नाव नाही.
मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानावरील आंदोलनप्रकरणी जयश्री पाटील यांना २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना सोमवारी दिले.
हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून, त्यात तपास सुरू आहे. त्यामुळे अर्जदाराला (जयश्री पाटील) दिलासा देऊ नये, असे म्हणत सरकारी वकिलांनी पाटील यांच्या जामीनवर आक्षेप घेतला. मूळ एफआयआरमध्ये पाटील यांचे नाव नाही. तिसऱ्या रिमांडमध्ये त्यांचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आला आहे. तसेच एफआयआर क्रमांकामध्ये तांत्रिक दोष असल्याने न्यायालयाने पाटील यांना अंतरिम दिलासा दिला.
जयश्री पाटील यांच्या वतीने निरंजन मुंदरगी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पाटील यांच्या नावाचा उल्लेख नाही. या गुन्ह्याप्रकरणी अटकेत असलेले एसटी कामगार आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या तिसऱ्या रिमांडवेळी पोलिसांनी पाटील यांचा याप्रकरणी सहआरोपी म्हणून समावेश केला. शरद पवार निवासस्थानी हल्ल्याच्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसेच एसटी आंदोलनातून ‘आर्थिक लाभ’ उठविल्याचा आरोपही पाटील यांच्यावर आहे, असे मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपये घेऊन त्यांना पावती न दिल्याचा आरोप पाटील यांच्यावर आहे. मात्र, त्याचा संबंध सिल्व्हर ओक आंदोलनाशी जोडू नये. त्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे विचारात घेत न्यायालयाने पाटील यांना अंतरिम दिलासा दिला.
कर्मचारी जामिनासाठी सत्र न्यायालयात
या आंदोलनप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात २४ महिलांचा समावेश आहे. या सर्वांच्या अर्जावर २० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. बरेच लोक मुंबईबाहेरचे असल्याने त्यांच्याकडे जामिनाची अनामत रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत आणि हमीदारही नाहीत, असे त्यांच्या जामीन अर्जात म्हटले आहे.