मुंबई : 'अलिबाग से आया है क्या?' या वाक्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र ठाकूर यांच्या वतीने अॅड. रघुराज देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी 'विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसतात,' असे नमूद करत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, सिनेमा, नाटक, टीव्हीवरच्या मालिकांमधून प्रचलित झालेले काय रे अलिबागवरून आला आहेस का? हे वाक्य तू मूर्ख आहेस का? या आशयाने वापरले जात असल्याने विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणाची बदनामी करणारे आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. तसेच, कान्होजी आंग्रे, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य, यासारख्या अनेक थोर व्यक्ती अलिबागमध्ये होऊन गेल्या असल्याचे याचिकेत म्हटले होते.
त्याचबरोबर, नव्याने विकसित करण्यात आलेले सरकारी आणि खासगी उद्योगधंदे, प्रकल्प हे अलिबागचे महत्त्व अधोरेखित करतात. सेन्सॉर बोर्डाला कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अशाप्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.