Join us

Court: दाभोलकरांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला का? तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:47 AM

Narendra Dabholkar Murder Case: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला अथवा नाही, याबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला अथवा नाही, याबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.

तपास अधिकाऱ्यांनी आणखी तपास करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत तपास बंद करण्याची शिफारस केली आहे. तसा अहवाल सीबीआय मुख्यालयाला पाठविला आहे, अशी माहिती अतिरिक्त महाअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला दिली. 

सीबीआयने तपास पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी तपासात अनेक त्रुटी आहेत. तपास योग्यरीतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या देखरेखीखालीच तपास सुरू ठेवावा, अशी विनंती दाभोलकरांच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड. अभय नेवगी यांनी खंडपीठाला केली. सीबीआय मुख्यालय तपासाबाबत भूमिका स्पष्ट करेल, त्यानंतर  आम्ही या याचिकेवर निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दाभोलकर यांची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सीबीआयने पाच जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत माहिती मागितली होती.

१५ साक्षीदारांची साक्ष पूर्णसोमवारच्या सुनावणीत सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, पुढील तपासही पूर्ण झाला आहे. त्यामुळे आणखी तपास करण्याची आवश्यकता नाही. तसा अहवाल मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे. या अहवालावर निर्णय घ्यायला तीन आठवड्यांची मुदत द्यावी. ‘आतापर्यंत ३२ साक्षीदारांपैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे. खटला सुरू असतानाही तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवायची की नाही, हे आम्ही न्यायालयाच्या निर्णयावर सोडत आहोत,’ असे सिंग यांनी म्हटले. न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य करत पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर ठेवली.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकरन्यायालय