अभिनेता सलमान खानला न्यायालयाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:09 AM2021-09-17T04:09:48+5:302021-09-17T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता सलमान खान, त्याचे सिनेमे आणि त्याची कंपनी यांच्याविरोधात कोणतीही टिप्पणी कऱण्यास मज्जाव करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सलमान खान, त्याचे सिनेमे आणि त्याची कंपनी यांच्याविरोधात कोणतीही टिप्पणी कऱण्यास मज्जाव करणाऱ्या अंतरिम निकालाच्या विरोधात कमाल खान याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारी सलमान खानला नोटीस देण्यात आली.
प्रेक्षकाला चित्रपट किंवा त्यातील पात्रांबद्दल टिप्पणी करण्यास मनाई करता येणार नाही. सलमान खानबद्दल वैयक्तिक टिप्पणी करण्यापासून न्यायालय रोखू शकते. मात्र चित्रपटांवर वाजवी टीका करण्यास मनाई करू शकत नाही, असा दावा कमाल खानने याचिकेत केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्याकडे सुनावणी झाली. त्यात सलमान खान, त्याची निर्मिती कंपनी सलमान खान व्हेंचर्स आदींना म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
राधे चित्रपटावरील कमाल खान याची टिप्पणी, काही व्हिडीओ आणि निवेदनांमुळे बदनामी झाल्याची याचिका सलमानच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर जूनमध्ये दिलेल्या अंतरिम आदेशाला कमाल खान याने आव्हान दिले आहे. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत सलमान खान, त्याचे चित्रपट, कुटुंबातील सदस्य यांच्याविषयी बदनामीकारक माहिती समाजमाध्यमात पोस्ट करण्यास किंवा प्रकाशित करण्यापासून कमाल खानला रोखण्यात आले आहे.
कमाल खान याच्या वतीने मनोज गडकरी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलात न्यायालयाचा अंतरिम आदेश हा सरसकट बंदीपेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्याला त्याच्या चित्रपट समीक्षणाच्या अधिकारापासून रोखण्यात आले आहे. हे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, तसेच त्याच्या उपजीविकेच्या साधनांवरील निर्बंधासारखे आहे, असाही दावा याचिकेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनी यावर सुनावणी होणार आहे.