उड्डाणपुलासाठी कांदळवन तोडण्यास कोर्टाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:10 AM2019-03-13T01:10:17+5:302019-03-13T01:10:49+5:30
उच्च न्यायालयाने वांद्रे येथील १४ कांदळवने तोडण्याची परवानगी एमएमआरडीएला दिली
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे वरळी सी-लिंक एकमेकांना जोडण्यासाठी व येथील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने वांद्रे येथील १४ कांदळवने तोडण्याची परवानगी एमएमआरडीएला मंगळवारी दिली.
वांद्रे येथील ०.०४८४ हेक्टर परिसरातील कांदळवन तोडण्याची परवानगी मागण्याकरिता एमएमआरडीएने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. बी. आर. गवई व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे होती. कांदळवने तोडण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट व अन्य प्राधिकरणांकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली आहे. प्रस्तावित उड्डाणपूल सायन-वांद्रे-बीकेसी यांना जोडणारा असेल. त्यामुळे येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल.
न्यायालयाने एमएमआरडीची विनंती मान्य करताना म्हटले की, परवानगी देताना आम्ही जनहित विचारात घेतले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. ‘प्रस्तावित प्रकल्पामुळे सायन-वांद्रे व वांद्रे वरळी सी लिंक एकमेकांना जोडले जाईल. याचाच अर्थ पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडला जाईल,’ असे न्यायालयाने म्हटले.