जिया खान आत्महत्या प्रकरण, राबिया खान यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:50 AM2018-12-06T05:50:52+5:302018-12-06T05:50:58+5:30
जिया खान आणि तिचा प्रियकर सूरज पांचोली यांच्यामध्ये ब्लॅकबेरी मॅसेंजरवरून झालेला संवाद पुन्हा उपलब्ध करण्याची राबिया खान यांची मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.
मुंबई : जिया खान आणि तिचा प्रियकर सूरज पांचोली यांच्यामध्ये ब्लॅकबेरी मॅसेंजरवरून झालेला संवाद पुन्हा उपलब्ध करण्याची राबिया खान यांची मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. सूरज पांचोली याच्यावर जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
३ जून, २०१३ रोजी बॉलीवूड अभिनेत्री जिया खानने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिची आई राबिया यांनी बॉलीवूड अभिनेता सूरज पांचोली आणि जियामध्ये ब्लॅकबेरी मॅसेंजरवरून झालेला संवाद पुराव्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध करण्याची मागणी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. न्या. मृदुला भाटकर यांनी राबिया यांची ही मागणी फेटाळली. राबिया यांनी केलेली विनंती कायद्याच्या दृष्टीने मान्य करणे शक्य नाही, असे न्या. भाटकर यांनी म्हटले.
गेल्या सुनावणीत सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, जिया आणि सूरजचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला होता. तज्ज्ञांनी मोबाइमधील मेसेज पुन्हा मिळविणे शक्य नसल्याचे सांगितले.
जानेवारी, २०१८ मध्ये सीबीआयने जिया खान आत्महत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करीत, सूरज पांचोलीवर जियानस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला.