मुंबई : एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंधाप्रकरणी आरोपी असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाने बुधवारी नकार दिला. तेलतुंबडे यांचा भाऊ नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे पोलीस चकमकीत ठार झाल्याने ९० वर्षांच्या आईचे सांत्वन करण्याकरिता त्यांनी अंतरिम जामीन अर्ज केला होता. एल्गार परिषदप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना एप्रिल २०२०मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांना नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
न्या. डी. ई. कोथळीकर यांनी तेलतुंबडे यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास नकार दिला होता. दि. २३ नोव्हेंबर रोजी तेलतुंबडे यांनी अंतरिम जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ‘१३ नोव्हेंबरला माझ्या भावाचा गडचिरोली येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याचे समजले. माझी आई ९० वर्षांची आहे. घरात मोठा असल्याने व आईचे सांत्वन करण्यासाठी मला घरी जाणे आवश्यक आहे’, असे तेलतुंबडे यांनी अर्जात म्हटले होते. तेलतुंबडे यांनी १५ दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला केली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी कारागृहात नेण्यासाठी प्लास्टिकचे टेबल आणि खुर्ची देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्याशिवाय स्वत:चे दाढी करण्याचे सामान देण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने याबाबत कारागृहाकडून उत्तर मागत ८ डिसेंबर रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे.