लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खार येथील फ्लॅट वाचविण्यासाठी अभिनेत्री कंगना रनौतने दाखल केलेला दावा दिंडोशी दिवाणी न्यायालयाने फेटाळला.
मुंबई महापालिकेने कंगनाच्या खार येथील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी २०१८ मध्ये नोटीस बजावली. कंगनाने या नोटीसला २०१९ मध्ये दिंडोशी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने तिचा दावा फेटाळत, उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली.
खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रिझ या इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाने तीन फ्लॅट घेतले आहेत. तिने हे फ्लॅट एकत्र करून पाचव्या मजल्यावरील वापरात नसलेल्या भागातील ५० टक्क्यांहून अधिक भागावर अनधिकृतपणे बांधकाम केले.
मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बांधकाम न केल्याप्रकरणी पालिकेने बजावलेल्या नोटिसीला विकासक आरकेडब्ल्यू यांनीही न्यायालयात विरोध केला. विकासक आणि कंगना रनौत यांना पालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अंतर्गत नोटीस बजावली.
२०१४च्या मूळ आराखड्यानुसार फ्लॅटचे बांधकाम असावे. अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे, तसेच एका महिन्यात संबंधित बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करण्याची मुभाही पालिकेने दिली. तसे न केल्यास तिच्यावर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही पालिकेने कंगनाला बजावले होते.
......................