लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असे राहुल गांधी यांनी २०१४च्या भाषणात म्हटले होते. त्या भाषणाचे ट्रान्स्क्रिप्शन पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, न्यायालयाने सोमवारी त्यांची याचिका फेटाळली.
राहुल गांधी यांच्या भाषणाचे ट्रान्स्क्रिप्शन पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासंबंधी कुंटे यांनी केलेला अर्ज सप्टेंबर २०१८मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. त्या निर्णयाला कुंटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या एकलपीठाने सोमवारी दंडाधिकारी यांचे आदेश योग्य ठरवत कुंटे यांची याचिका फेटाळली.
अन्य एका प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी फौजदारी दंडसंहितेंतर्गत केलेल्या कारवाईला काँग्रेस नेत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामध्ये त्यांनी २०१४ मधील भाषणाचे ट्रान्स्क्रिप्शन सादर केले आहे. हे ट्रान्स्क्रिप्शन पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश भिवंडी दंडाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी कुंटे यांनी याचिकेत केली होती.
जून २०१८ मध्ये दंडाधिकाऱ्यांनी आरएसएस मानहानी दाव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित केले. मात्र, सप्टेंबर २०१८ मध्ये गांधी यांच्या भाषणाचे ट्रान्स्क्रिप्शन पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास भिवंडी दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला. राहुल गांधी यांना समन्स बजावण्यापूर्वी न्यायालयाने त्यांच्या भाषणाची सीडी ऐकली होती. तरीही त्या भाषणाचे ट्रान्स्क्रिप्शन पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यास नकार दिला, असे कुंटे यांनी याचिकेत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
६ मार्च २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी ठाण्यातील भिवंडीत केलेल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे म्हटले. गांधी यांचे हे वक्तव्य संघाची प्रतिष्ठा मलिन करणारे आहे, असे म्हणत कुंटे यांनी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात खासगी तक्रार केली. कायदेशीर कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली.