एमडी पुनर्चाचणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By admin | Published: August 18, 2015 02:16 AM2015-08-18T02:16:00+5:302015-08-18T02:16:00+5:30
ड्रगमाफीया बेबी पाटणकर, बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखेचे एमडी प्रकरण आणि त्यात चार पोलीस अधिकाऱ्यांना झालेली अटक गुन्हे शाखेला शेकण्याची दाट
मुंबई : ड्रगमाफीया बेबी पाटणकर, बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखेचे एमडी प्रकरण आणि त्यात चार पोलीस अधिकाऱ्यांना झालेली अटक गुन्हे शाखेला शेकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काळोखेकडून हस्तगत केलेल्या तथाकथित एमडीची हैदराबाद येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पुन्हा चाचणी करू द्यावी ही गुन्हे शाखेची मागणी सोमवारी विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. याआधी मुंबईतील प्रयोगशाळेने हे एमडी नसून अजिनोमोटो असल्याचा अहवाल गुन्हे शाखेला दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जप्त अमलीपदार्थांची पुनर्चाचणी हा पर्याय आरोपीसाठी किंवा दुर्मीळ प्रकरणांमध्ये उपलब्ध होतो. चार पोलीस अधिकारी आरोपी आहेत म्हणून हे प्रकरण दुर्मीळ ठरत नाही. शिवाय पहिला अहवाल मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत पुनर्चाचणीसाठीचा अर्ज न्यायालयासमोर यायला हवा. या प्रकरणात पहिला अहवाल २ मेला स्वीकारणाऱ्या गुन्हे शाखेने पुनर्चाचणीसाठीचा अर्ज २९ मे रोजी न्यायालयात केला. आरोपी काळोखेच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील कपाटात सापडलेली पांढरी भुकटी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवताना पोलिसांनी आवश्यक ती प्रक्रिया अचूकपणे पार पाडली आहे. त्यामुळे नमुन्यांबाबत कोणतीही शंका घेण्यास वाव नाही, हा बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधीश न्या. यू. बी. हजीब यांनी गुन्हे शाखेचा अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणात अॅड. एन.एन. गव्हाणकर, अॅड. जयेश वाणी यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, या प्रकरणात प्रयोगशाळेचा अहवाल हाती आल्यानंतर गुन्हे शाखेने तत्कालीन अमलीपदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान
युनिटचे वरिष्ठ निरीक्षक सुहास गोखलेंना अटक केली.
जेव्हा काळोखेच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील कपाटातून पोलिसांना पांढरी भुकटी
मिळाली होती तेव्हाच गोखले यांनी हे एमडी नाही असे
निरीक्षण नोंदविले होते. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर कारवाई केलेली योग्य, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. (प्रतिनिधी)