अमित शहांच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:42 PM2018-11-02T12:42:58+5:302018-11-02T12:46:19+5:30
बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबई- सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात अमित शहा यांच्या सुटकेला आव्हान देण्यासाठी बॉम्बे लॉयर्स असोसिएशननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सीबीआयनं अमित शहा यांच्या सुटकेला आव्हान द्यावं, असं नमूद केलं होतं. परंतु सीबीआयनं अमित शाहांच्या सुटकेला आव्हान दिलं नाही. त्यामुळे बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत तपास यंत्रणा आरोपींमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने केला होता. त्यानंतर सीबीआयने बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची जनहित याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने प्रसिद्धी मिळावी, या हेतूने याचिका दाखल केली आहे, असा दावा सीबीआयतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे केला होता.
अमित शहा यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालायत दाखल असून, न्यायालयाने सर्व फेटाळल्या. त्यामुळे उच्च न्यायालयाने असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद सिंग यांनी केला होता. तर आरोपमुक्ततेला आव्हान द्यायचे किंवा नाही, याबाबत सीबीआय निवड कशी करू शकते? काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे आणि शहा यांना यातून वगळायचे, हा सीबीआयचा निर्णय भेदभाव करणारा आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील अहमद अब्दी यांनी केला होता. शहा यांच्या आरोपमुक्ततेबाबत सीबीआयच्या निर्णयाला आव्हान देणारी ही चौथी याचिका होती. पहिल्यांदा सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख यांनी या निर्णयाला आव्हान दिले. मात्र, काही दिवसांनी त्यानेच ही याचिका मागे घेतली होती.