Join us

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्याची न्यायालयाने केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेदरकारपणे गाडी चालवणे व दुर्लक्ष केल्यामुळे ६० वर्षांच्या महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपीची दंडाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बेदरकारपणे गाडी चालवणे व दुर्लक्ष केल्यामुळे ६० वर्षांच्या महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपीची दंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली. पूर्व द्रुतगती महामार्ग क्रॉस करीत असताना आरोपीने महिलेला उडविले. त्यात तिचा मृत्यू झाला.

नागरिकांनी झेब्रा क्रॉसिंगशिवाय महामार्ग क्रॉस करू नयेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. २८ ऑगस्ट रोजी दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी हेमंत हटकर याची सर्व आरोपातून सुटका केली.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, हटकर याच्या गाडीने पीडिता मुद्रिका कांबळे यांना उडविल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा अपघात झाला त्यावेळी कांबळे चेंबूरजवळचा पूर्व द्रुतगती महामार्ग क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होत्या.

हटकर याची सुटका करताना न्यायालयाने म्हटले की, कांबळे यांचा मृत्यू हटकर याच्या गाडीबरोबर झालेल्या अपघातामुळेच झाला, असे सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर आणले नाहीत. तसेच या आरोपीचा या घटनेशी संबंध आहे, हेही सिद्ध करणारे पुरावे सरकारी वकिलांनी सादर केले नाहीत.

पंचनाम्यावरून असे समजते की, हा अपघात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर झाला. अपघाताच्या ठिकाणापासून ३५ फूट अंतरावर पदपथ आहे आणि १५ फूट अंतरावर रस्ता विभाजक आहे. याचाच अर्थ पीडिता रस्ता क्रॉस करीत असताना हा अपघात रस्त्याच्या मधोमध झाला, असे न्यायालयाने म्हटले.

झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह असल्याशिवाय पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडू नये, हे सर्वश्रुत आहे. पीडिता झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत असताना अपघात झाला, असे रेकॉर्डवर नाही, असे म्हणत न्यायालयाने हटकर याची सुटका केली.