दया नायकला कोर्टाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:39 AM2018-02-08T04:39:07+5:302018-02-08T04:39:29+5:30
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची फाईल बंद करण्यात यावी, यासाठी पोलिसांनी विशेष एसीबी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. २०१०मध्ये विशेष एसीबी न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारण्यास नकार देत पोलिसांना या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची फाईल बंद करण्यात यावी, यासाठी पोलिसांनी विशेष एसीबी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. २०१०मध्ये विशेष एसीबी न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारण्यास नकार देत पोलिसांना या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता सात वर्षांनी विशेष न्यायालयाने पोलिसांचा अहवाल स्वीकारत दया नाईक यांना दिलासा दिला आहे. याचा अर्थ पोलिसांना दया नायक यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने त्यांच्यावर खटला चालणार नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आॅगस्ट २०१०मध्ये दया नायक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात विशेष न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला होता. त्यांच्यावर खटला चालविण्याइतपत पुरावे तपास यंत्रणेकडे नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने तो अहवाल स्वीकारण्यास नकार देत एसीबीला पुन्हा एकदा नव्याने तपास करण्याचे निर्देश दिले. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
एसीबीने केलेल्या दाव्यानुसार, दया नाईक यांचा ८०० चौ. मी.चा फ्लॅट चारकोप येथे आहे. तसेच त्यांच्याकडे जीप आहे. ते एका कंपनीचे मालक असून त्यांनी त्यांच्या मूळ गावी शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपये दिले आहेत. नायक यांनी बोगस कंपनीद्वारे अन्य ठिकाणी पैसे वळते केले आहेत.
दया नायक यांनी आत्तापर्यंत ८० जणांचे एन्काउंटर केले आहे. एसीबी या प्रकरणाचा तपास करत असल्याने २००६मध्ये त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, दया नायक यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरावे नाहीत. जर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा १० टक्के अधिक संपत्ती असेल, तर गुन्हा होऊ शकत नाही.