Join us

पाडकामाचे आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टप्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 8:18 AM

अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टच्या मालकाने पाडकामाच्या कारवाईचे आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या राजकीय वैरामुळे आपण भरडले जात असल्याचे रिसॉर्ट मालक सदानंद कदम यांनी याचिकेत म्हटले आहे.एमसीझेडएमने २५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना रिसॉर्ट मालकाची बाजू न ऐकण्याचा आदेश दिला. या आदेशाला रिसॉर्ट मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान  दिले.

या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी झाली. त्याशिवाय केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने संपूर्ण रिसॉर्टचे बांधकाम पाडून भूखंड पूर्ववत करण्याचा आदेश ३१ जानेवारी रोजी दिला. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पर्यावरणाचे नुकसान केल्याप्रकरणी कदम यांच्याकडून २५ लाख रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश दिला.कदम यांच्या म्हणण्यानुसार, २९ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी मुरूड तहसील, दापोली येथे अनिल परब यांच्याकडून नोंदणीकृत व मुद्रांकित विक्री कराराद्वारे जमीन खरेदी केली. भूखंडाचे ‘कृषी’ वरून ‘अकृषी’मध्ये रुपांतर करून त्यांनी तळमजला अधिक एका मजल्याचे काम केले. सुरुवातील वैयक्तिक वापरासाठी बांधकाम करण्यात आले असले तरी पर्यटनाच्या वाढीमुळे त्याचे रिसॉर्टमध्ये रुपांतर करण्याचा विचार होता. मात्र, अद्याप हे बांधकाम रहिवासी वा रिसॉर्टसाठी म्हणून पूर्ण झालेले नाही. संबंधित बांधकाम अपूर्णच आहे. अनिल परब यांच्याशी असलेल्या राजकीय वैमनस्यातून संबंधित जमिनीसंदर्भात २०२०-२१ मध्ये खोट्या कारवाया केल्या. जारी केलेल्या आदेशात तथ्य नाही. परब व आपल्यावरील आरोप तथ्यहीन आहेत, असा दावा कदम यांनी केला आहे.

टॅग्स :अनिल परबन्यायालय