मुंबई : मराठी भाषेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉनमधील वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अॅमेझॉनने दिंडोशी न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसेविरुद्ध खासगी तक्रार केली आहे. सदर प्रकरणी न्यायालयाने राज ठाकरे यांना नोटीस बजावत ५ जानेवारी रोजी त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनची पोस्टर्स फाडण्यास सुरुवात केली. त्यावरून अॅमेझॉनने राज ठाकरे व मनसे यांच्याविरुद्ध तक्रार केली. अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्याची विनंती करूनही त्यांनी दखल न घेतल्याने मनसेने हे पाऊल उचलले. अॅपमध्ये मराठीचा समावेश करावा, यासाठी कंपनीशी पत्रव्यवहार, चर्चा करून किंवा निवेदन पाठवूनही कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही, असे मनसेचे म्हणणे आहे.अॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यात आला नाही तर निदर्शने करण्यात येतील. मराठी भाषेला देण्यात येणारी सावत्र वागणूक सहन करणार नाही, अशी तंबी मनसेने कंपनीला दिली होती.
अॅमेझॉनप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाने पाठवली नोटीस , मराठी भाषेवरून मनसेचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 4:36 AM