मुंबई : बॉलीवूडमधील अल्पवयीन अभिनेत्रीबरोबर विमानात झालेल्या विनयभंगप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने व्यावसायिक विकास सचदेव याला पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने त्याची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करीत तीन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.
९ डिसेंबर २०१७ रोजी विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून दिल्लीहून मुंबई असा प्रवास करीत असताना पाठच्या सीटवर बसलेल्या विकास सचदेवने विनयभंग केल्याचा आरोप संबंधित अभिनेत्रीने केला. तिने इन्स्टाग्रामद्वारे ही घटना उघडकीस आणली. मात्र, विकास याची पत्नी दिव्या सचदेव यांनी संबंधित अल्पवयीन अभिनेत्री केवळ प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करीत असल्याचा दावा केला.
संबंधित अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, विस्ताराच्या विमानातून रात्री दिल्लीहून मुंबईला प्रवास करीत असताना माझ्या बाजूला बसलेल्या एका प्रौढ व्यक्तीने हा प्रवास माझ्यासाठी नकोसा केला. तो सतत माझ्या खांद्यावर डोके ठेवत होता. त्याचे पाय सतत माझ्या पाठीला व मानेला लागत होते. त्यामुळे मी त्याचे मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करीत होते.
त्यावर विकासच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, त्या दिवशी विकासच्या मामाचे निधन झाले होते. सकाळी सात वाजता तो दिल्लीला पोहोचला. रात्री साडेनऊ वाजता मुंबईला परत येण्यासाठी दिल्लीवरून विमान पकडले. मानसिक तणावाने व शरीराने थकल्याने विकास याने विमानातील केबिन क्रूला झोपण्यासाठी चादर मागितली. त्या वेळी त्याने आपल्याला जेवण्यासाठी उठवू नका, असेही त्यांना सांगितले.
झोपेत असलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला तर त्याला विनयभंग कसे म्हणता येईल? घडलेल्या घटनेबाबत तिने केबिन क्रूला का नाही सांगितले? तिच्याबरोबर तिची आईही प्रवास करीत होती, मग तिने ही घटना तत्काळ आईच्या कानावर का घातली नाही? असा युक्तिवाद सचदेव यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.