ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण करणारे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. आज शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठी अभिनेत्री केतकी चितळेनेही यावरुन आरोप केला आहे. "जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास पाहता कोर्टाने त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.
केतकी चितळेने वर्तक नगर पोलीस ठाण्यात एक पत्र दिले आहे. यात तिने आणखी कलमे लावण्याची मागणी केली आहे. आव्हाड यांनी चित्रपटा संदर्भात पत्रकार परिषद घ्यायला हवी होती. ठाण्यात जे घडल ते सगळ प्लॅन करुन केल्यासारखे वाटत होते. जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास पाहता न्यायालयाने त्यांना जास्तीत जास्त दिवस कोठडी दिली पाहिजे, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.
आव्हाड यांना अटक, रात्र पोलीस कोठडीतच; चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकाला मारहाण करणे भाेवले
हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यातील मॉलमधील ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षक दाम्पत्याला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड, तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह १०० जणांविरुद्ध ८ नोव्हेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. आव्हाड यांच्यासह परांजपे, तसेच अन्य नऊ अशा ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करीत त्यांच्या सुटकेची मागणी केली.