मुंबई : राम मंदिर बांधले जावे ही सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान संघाने कधी केला नाही. परंतू, न्यायालयाने जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी सांगितले.
भाईंदरच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संघाची तीन दिवसीय बैठक पार पडली. आज शेवटच्या दिवशी जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जोशी यांनी राम मंदिरावर संघाची भुमिका मांडली.
सर्वोच्च न्यायालय योग्य न्याय करेल अशी अपेक्षाही व्यक्त करताना त्यांनी निकालाला वेळ लागत असल्याचे वेदनादायी असल्याचे म्हटले. तसेच गरज पडली तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेऴी दिला. तसेच न्यायालयात असल्याने आंदोलकांवर मर्यादा आहेत असेही त्यांनी कबुल केले.
मंदिरांमध्येही प्रवेशावरून भय्याजी जोशी यांनी आपले मत मांडले. कायद्याने स्त्री-पुरुषाला समान हक्क मिळाला आहे. महिलांना मंदिरात प्रवेश मिळायलाच हवा. पण काही मंदिरांचे नियम असतात. तेही पाळायला हवे, अशी संघाची भूमिका असल्याचे जोशी म्हणाले.