मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २०२१ मध्ये यू-ट्यूब व ट्विटर विरोधात दाखल केलेला दावा बुधवारी एस्प्लनेड दंडाधिकारी न्यायालयाने रद्द केला. आपली बदनामी केलेल्या व्यक्तींची सोशल मीडिया पोस्ट काढून टाकव्यात अशी मागणी राऊत यांनी दाव्याद्वारे केली होती.
राऊत यांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या ट्विटर हँडलवर तसेच इतर सोशल मीडिया खात्यांविरोधात दावा दाखल केला होता. राऊत यांच्या वकिलांनी दावा मागे घेण्याची परवानगी दंडाधिकाऱ्यांकडे मागितली. मात्र, दंडाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. रेकॉर्डवरून असे दिसून येते की, ७ एप्रिल २०२२ पासून अर्जदार (राऊत) आणि त्यांचे वकील सतत गैरहजर आहेत. कोणतीही योग्य पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे हा दावा प्रलंबित ठेवून काहीच हेतू साध्य होणार नाही, असे दंडाधिकारी के. एस. बाळासाहेब यांनी म्हटले.
पाटकर यांनी ट्विटरवर दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे देशाच्या शांततेला हानी पोहोचू शकते, असे दाव्यात म्हटले होते. ‘पाटकर यांनी केलेले ट्वीट विद्यमान खासदारांची बदनामी करणारे आहे. महाराष्ट्रातील राजकीय आणि काही गटांमध्ये तेढ निर्माण करणारे ट्वीट पाटकर यांनी केले आहे,’ असा आरोप संजय राऊत यांच्या दाव्याद्वारे करण्यात आला होता.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी... पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी डॉ. स्वप्ना पाटकर या ईडीच्या साक्षीदार आहेत. काही वर्षांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत आपल्याला धमकावत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयातही धाव घेतली. डॉ. स्वप्ना पाटकर आपल्याला मुलीप्रमाणे आहे आणि त्यांच्यातील वाद हे कौटुंबिक आहेत, असे संजय राऊत यांनी उच्च न्यायालयालाही सांगितले होते.