इशरतच्या आईला न्यायालयाचे समन्स, अनेकांच्या भुवया उंचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:05 AM2017-11-12T03:05:07+5:302017-11-12T03:05:26+5:30
मागील काही तारखांना सातत्याने गैरहजर राहिलेल्या इशरत जहाँच्या आईला मंगळवारी (१४ नोव्हेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे समन्स अहमदाबाद उच्च न्यायालयाने पाठवले आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंब्रा : मागील काही तारखांना सातत्याने गैरहजर राहिलेल्या इशरत जहाँच्या आईला मंगळवारी (१४ नोव्हेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे समन्स अहमदाबाद उच्च न्यायालयाने पाठवले आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची कथित हत्या करण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचलेली इशरत तसेच अन्य तिघांना १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथे झालेल्या चकमकीत ठार केले होते. ती चकमक खोटी असल्याचा दावा तिची आई शमिमा कौसर यांनी केला आहे. त्यावर, अहमदाबाद उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यातून नावे वगळण्यात यावीत, यासाठी तत्कालीन तीन अधिकाºयांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जाला अनुसरून पडलेल्या तारखांची माहिती नसल्यामुळे कौसर तसेच त्यांच्या वकील वृंदा कौर न्यायालयात गैरहजर होत्या. यामुळे समन्स बजावण्यात आले आहे. शारीरिक अस्वास्थ्यामुळे त्या दिवशी न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय कौसर यांनी अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती कौसर कुटुंबीयांचे जवळचे स्नेही आणि खटल्यासाठी त्यांना वेळोवेळी मदत करणारे माजी नगरसेवक रौफ लाला यांनी ‘लोकमत’ला दिली.