मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक प्रवीण कलमे यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवडी महानगर न्यायालयाने समन्स बजावले आहेत. त्यामुळे सोमय्या यांना दि. २२ सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजी सुनावणीला हजर रहावे लागणार आहे.
प्रवीण कलमे हे गृहनिर्माण विभागाचे सचिन वाझे असून, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि म्हाडा या संस्थांमधून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश त्यांना दिले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी १ एप्रिल रोजी केला होता. त्यानंतर कलमे यांनी सोमय्या यांच्याविरोधात मानहानीचा दावा करत याचिका दाखल केली होती.
न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांआधारे प्रथमदर्शनी असे दिसून येते की, किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर लिहिलेला मजकूर किंवा माध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचली आहेत. त्यांच्या या कृतीमुळे तक्रारदारांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली आहे. त्यामुळे कलम ४९९ आणि ५०० येथे लागू होत असल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी पुढील सुनावणीला हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने बजावले आहेत.