Join us

कोर्ट हा सामान्यांना घेऊन केलेला सिनेमा’

By admin | Published: April 12, 2015 12:05 AM

‘कोर्ट’ या सिनेमासाठी अकरा महिने न्यायालयीन व्यवस्थेवर संशोधन करून त्यानंतर दीड महिन्याच्या काळात पटकथा लिहिली.

‘मुंबई : ‘कोर्ट’ या सिनेमासाठी अकरा महिने न्यायालयीन व्यवस्थेवर संशोधन करून त्यानंतर दीड महिन्याच्या काळात पटकथा लिहिली. या संशोधनाच्या काळात कोर्ट, वकील, बाररूम, स्टाफरूम अशा वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण केले. एकूण साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर सामान्य लोकांसाठी सामान्यांना घेऊन केलेली वैशिष्ट्य कलाकृती प्रेक्षकांसमोर येते आहे, याबाबत उत्सुकता असल्याचे दिग्दर्शक-लेखक चैतन्य ताम्हाणेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमाच्या टीमने लोकमत चिंचपोकळी कार्यालयाला भेट दिली. या वेळी दिग्दर्शक-लेखक चैतन्य ताम्हाणे, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी, वीरा साथीदार आणि विवेक गोम्बर उपस्थित होते. या सिनेमाचे जागतिक पातळीवर खूप कौतुक झालेच, मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनातील अडथळे कमी झाल्याचे चैतन्यने सांगितले.या सिनेमाच्या संगीतातही वेगळा प्रयोग केल्याचे चैतन्यने सांगितले. त्यासाठी संभाजी भगत यांनी पोवाड्याचे रेकॉर्डिंग स्टुडिओत न करता मोकळ्या जागी करून सलग २५ टेक्स करत गाणे गायले. शाहिरीच्या अस्सल मातीचा बाज सिनेमाच्या दोन्ही पोवाड्यांमध्ये असल्याचे चैतन्यने सांगितले. गीतांजलीने सरकारी वकिलाच्या आव्हानात्मक भूमिकेसाठी वेगवेगळ्या सरकारी वकिलांची भेट घेतल्याचे सांगितले. तर वीरा साथीदार यांनी आपल्या व्यक्तिरेखेतील विरोधाभासाबद्दल सांगत सिनेमाने बरेच काही शिकवल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)