मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर येथे सुरू असलेले महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या बाजूच्या भूखंडावर लवकरच सुसज्ज असे न्यायालय उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. पालिकेच्या नव्या विकास आराखड्यात त्याकरिता जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून, विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर प्राधान्याने न्यायालयाचे बांधकाम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.विक्रोळी न्यायालयात प्रचंड गर्दी असते. त्याचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे शेजारील भूखंडावर न्यायालय उभारण्याची मागणी शिवसेनेचे अनिल परब यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.पालिकेच्या १९९१च्या आराखड्यात या जागेवर वर्किंग वुमन हॉस्टेल असे आरक्षण होते. सरकारने न्यायालयाच्या सल्ल्यानुसार सदर आरक्षण बदलण्याचे निर्देश दिले होते. प्रारूप विकास आराखड्यात या जागेवर मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटरचे आरक्षण टाकले. विकास आराखडा पालिकेकडून मंजूर होऊन सरकारकडे आल्यानंतर न्यायालयासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागामार्फत नगर विकास विभागाला पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
विक्रोळीमध्ये न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:48 AM