Join us

उपाययोजनांवरच आच्छादन; मुंबई पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची शून्य अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 6:25 AM

धुळीचे साम्राज्य कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असली तरी  विशेष करून बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे अजूनही दिसत नाही. काही बांधकामांच्या ठिकाणी हिरवे कापड टाकून धुळीला अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले. मात्र स्प्रिंकलर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याची फवारणी करणाऱ्या यंत्रणा यांचा अभाव जाणवत आहे. 

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्तांनी प्रदूषण रोखण्यासाठी  मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या तत्त्वांचे पालन न करणाऱ्या बांधकामांच्या प्रसंगी कामही थांबवण्याचा इशारा दिला आहे. उपाययोजना करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला  १५ दिवसांची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी खरोखरच केली जात आहे का, याचा आढावा घेतला असता अजून तरी बांधकाम क्षेत्र निवांत असल्याचे आढळून आले.

कन्नमवार नगरातील स्थिती...

     विक्रोळी कन्नमवार नगर या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे वेगाने सुरू आहेत.     १८ ते २२ मजल्यांचे टॉवर उभे राहू लागले आहेत. या ठिकाणी कसलेही नियम पाळले जात नाहीत.     बांधकाम स्थळावरून डेब्रिज घेऊन बाहेर निघणाऱ्या वाहनांवर आच्छादन नसते, त्यावर पाणी फवारले जात नाही, वाहनांचे टायर धुतलेले नसतात, मुख्य रस्त्यावर ही वाहने धूळ पसरवत जातात.      रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. जुने बांधकाम तोडताना जुजबी व्यवस्था असते. परंतु तोडकाम होत असताना उडणाऱ्या धुळीला अटकाव करण्यासाठी काहीही उपाय केले जात नाहीत, असे चित्र दिसते.

पूर्व द्रुतगती महामार्गालगत सुरू असलेल्या बांधकामांच्या काही ठिकाणी झाकपाक करण्यात आली आहे. मात्र, तिथेही वरवरची मलमपट्टी केल्याचे दिसते. बांधकामाचा काहीसा भाग आच्छादित केला आहे. फक्त विक्रोळीच नाही तर घाटकोपर, भांडुप, मुलुंड या ठिकाणीही थोड्याबहुत फरकाने असेच चित्र आहे. बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यास मात्र बिल्डर अनुत्सुक असल्याचे दिसले.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका