एटीएम कार्डसारखे उपकरण लपवून कॉपी; असा झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 05:33 AM2023-09-28T05:33:44+5:302023-09-28T05:34:44+5:30
कृषी विभागाच्या परीक्षेतील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासकीय कृषी विभागातील सहायक संचालक आणि वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या रामकिशन दातू बेडके (२५) याला पवई पोलिसांनी अटक केली. त्याने बँक एटीएम कार्ड प्रमाणे दिसणाऱ्या पोर्टेबल डिव्हाइसचा वापर करून हा प्रकार केला. त्याच्या नेटवर्कचा पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पवई परिसरातील मोरारजी नगरमध्ये असलेल्या ऑरम आयटी पार्कमध्ये २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते दहाच्या सुमारास कृषी विभागाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला हजारो विद्यार्थी बसले होते, त्यापैकी बेडके हादेखील एक होता.
ज्याने सिम कार्ड आणि बॅटरीने सुसज्ज डेबिट कार्डसारख्या दिसणाऱ्या फसव्या उपकरणाचा परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापर केला. त्याने त्याच्या उजव्या खांद्यावर हे डिव्हाइस बसवले होते तर त्याच्याशी संलग्न असलेले अवघ्या फक्त अर्ध्या इंचचे ब्लूटूथ इयरफोन हे त्याच्या डाव्या कानात इन्सर्ट केले होते. त्याच्या सहाय्याने माहिती मिळवून ताे काॅपी करत हाेता.
असे काम करते हे डिव्हाइस
ब्लूटूथ क्षमता असलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस डेबिट, क्रेडिट कार्डसारखे डिझाइन केलेले आहे. या डिव्हाइसमध्ये सिम कार्ड स्लॉट आणि बॅटरी कंपार्टमेंट हे दोन्ही आहेत. कोणत्याही मोबाइल फोनवरून किंवा लँडलाइनवरून, मोबाइल फोन नेटवर्कद्वारे गुप्त द्विमार्गी कनेक्ट करता येतात. ते इयरपीससाठी पुरेशी ऊर्जा निर्माण करणाऱ्या ऑप्टिमाइझ्ड इंडक्टिव्ह कॉइलसह सुसज्ज आहेत. ज्यामुळे थेट संवाद साधता येतो.
कृषी विभागातील विविध पदांच्या परीक्षेदरम्यान रामकिशन दातू बेडके याने एटीएमसारख्या दिसणाऱ्या डिव्हाइसचा वापर करून कॉपी केल्याचे उघड झाले.
त्वचेच्या रंगामुळे शंका आली नाही
कार्डचा रंग हा बेडकेच्या त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता असल्याने ही बाब सहज लक्षात येण्यासारखी नव्हती. परीक्षा पर्यवेक्षक धीरज यांना बेडकेच्या खांद्याचा भाग फुगलेला दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी त्याची तपासणी केली त्यावेळी भंडाफोड झाला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास सुरक्षारक्षकांनी पकडले.