Join us

कोविड १९ : रुग्णांच्या संपर्कातील नजिकच्यांचा शोध घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:29 PM

महानगरपालिका विभागनिहाय डॉक्टरांनी त्यांच्या परिसरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नजिकच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुरुवारी मुंबईत ९९८ नवीन प्रकरणे आढळली. २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत आहे. गुरुवारपर्यंत मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १९ हजार ५७९  झाली. तर ६२१ रुग्णांचा मृत्यू झाला. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. येथे एक हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली असून, मुंबईत कोरोनाचा आकडा वेगाने वाढत असतानाच रुग्णांच्या संपर्कातील नजिकच्यांचा शोध घ्या, असे निर्देशच देण्यात आले आहेत.महानगरपालिका विभागनिहाय डॉक्टरांनी त्यांच्या परिसरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नजिकच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात डॉक्टर्स आहेत. कोरोनाबाधित भागातील नागरिकांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना विश्वासात घ्यावे, जे नागरिक कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना शोधा आणि त्यांचे विलगीकरण, अलगीकरण करा. याबाबत मोठया प्रमाणात जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागात १०० खाटांचे सर्व सुविधांयुक्त रुग्णालय उपचारार्थ असले पाहिजे. कोरोना केअर सेंटर १ आणि २ मध्ये सर्व नागरी सेवा-सुविधा उत्तम आणि दर्जेदर मिळतील, अशी काळजी घ्यावी. खासगी रुग्णालय उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यास पालिकेचा कर्मचारी तेथे नियुक्त करा. विविध भागात विलगीकरण केंद्र मोठ्या प्रमाणात तयार होत असून त्या ठिकाणी जेवण-पाणी, परिसर स्वच्छता आदी सुविधा द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत.कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन करित असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्र, अन्न वितरण केंद्र आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याची माहितीही संजीव जयस्वाल यांनी घेतली. ताडवाडी प्रतिबंधित क्षेत्र, रिचर्डसन क्रूडास येथील कोरोना काळजी केंद्र तसेच कम्युनिटी किचन, बी विभाग हद्दीतील हॉटेल बिस्मिल्ला तसेच नजम बाग येथील कोरोना काळजी केंद्र या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची पाहणी करण्यात आली. ग्रँट वैद्यकीय जिमखाना व चर्नी रोड येथील मित्तल आयुवेर्दीक रुग्णालयामध्येही व्यवस्थेचे निरीक्षण करण्यात आले. एमपी मिल कम्पाऊंड येथे एसआरए इमारतीतील सुविधा, आदर्श पॅलेस हॉटेलमधील व्यवस्था, ए विभागातील सुंदर नगर आणि सुखदवाला येथील सेवेसह ए विभागामध्ये अन्न वितरणासाठी सुरु असलेल्या फूड किचनची व्यवस्थेच पाहणी करण्यात आली.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई