Coronavirus Mumbai Updates: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, धुळे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. यात सर्वाधिक मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होतेय. असं असतानाही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. "मुंबईकरांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करायला हवं", असं आवाहन चहल यांनी केलं आहे. (Mumbai BMC completes 10 lakh vaccinations resolved to increase jabs to 1 lakh per day says Iqbal Chahal)
१० लाख लोकांना लस, मुंबई पालिका पूर्णपणे सज्ज"मुंबईत आतापर्यंत १० लाख लोकांना लस देण्यात आली आहे आणि दिवसाला १ लाख लोकांना लस देण्याचं आमचं उद्दीष्ट आहे", असं चहल म्हणाले. यासोबतच मुंबईत येत्या काळात एका दिवसाला १० हजार रुग्ण वाढले तरी त्यांची व्यवस्था केली जाईल, असा दावा चहल यांनी केलाय.
मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान
"१० फेब्रुवारी ते २४ मार्च दरम्यान ५६ हजार २२० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पण बुधवारी एका दिवसात ४० हजार ४०० कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी ५ हजार ४५८ जण पॉझिटीव्ह आले. यातही ८३ टक्के कोरोना रूग्ण लक्षण नसलेले आहेत. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. महापालिकेचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे", असंही चहल यांनी सांगितलं.
दरम्यान, याआधीही इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नसल्याचं विधान केलं होतं. तेव्हाही चहल यांनी मुंबई कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे हे वाढत आहेत. त्यात बुधवारी एकाच दिवसात मुंबईत पाच हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत.
मुंबईत सध्या रुग्ण किती?आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या बुधवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या ३० हजार ७६० सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ७४ हजार ६११ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ११ हजार ६०६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्टमुंबई महापालिकेनं याआधीच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॅपिड अँटिजन टेस्ट सुरू करणार असल्याचं पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार शहरात विविध मॉल्सबाहेर, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, बाजाराची ठिकाणं येथे नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.