CoronaVirus News: ...तर सर्वप्रथम न्यायमंदिराचे दरवाजे उघडतील- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:08 AM2020-08-15T04:08:14+5:302020-08-15T04:08:30+5:30

कोरोनाची स्थिती सुधारलेली नाही, पर्युषण पर्वात जैन मंदिरे खुली करण्यास नकार

COVID-19 situation not conducive to reopening of temples says Bombay High Court | CoronaVirus News: ...तर सर्वप्रथम न्यायमंदिराचे दरवाजे उघडतील- उच्च न्यायालय

CoronaVirus News: ...तर सर्वप्रथम न्यायमंदिराचे दरवाजे उघडतील- उच्च न्यायालय

Next

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती सुधारलेली नाही. जेव्हा ती सुधारेल तेव्हा सर्वप्रथम सामान्यांसाठी न्यायमंदिराचेच दरवाजे उघडतील. मानवतेच्या मंदिरावर विश्वास असेल तर मंदिरे सुरू करण्याची मागणी करू नका. घरात बसूनच पूजा, प्रार्थना करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने पर्युषण पर्वात जैन मंदिरे खुली करण्याबाबत अंतरिम आदेश देण्यास नकार दिला.

१५ ते २३ आॅगस्ट या पर्युषण पर्वात जैन मंदिरे खुली करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला तसे निर्देश द्यावेत. राज्यात कोरोनाची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे काही ठरावीक अटी व मर्यादा घालून जैन मंदिरे सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकादारांचे वकील दीपेश सिरोया यांनी केली.

जैन मंदिरे खुली करण्याची विनंती मान्य करण्यास उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने दिलासा देण्यास नकार दिला असतानाही तीच विनंती तुम्ही का करत आहात, असा सवाल न्यायालयाने सिरोया यांना केला. कोरोनाची स्थिती सुधारली आहे, हा तुमचा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. तसे असते तर सर्वप्रथम सर्वसामान्यांसाठी न्यायमंदिराचेच दरवाजे उघडले असते, असे न्यायालयाने म्हटले.

आम्हाला सांगा तुमच्या मते सर्वात मोठे मंदिर कोणते, असा सवाल मुख्य न्या. दत्ता यांनी करताच सिरोया यांनी सांगितले की, मानवतेचे मंदिर सर्वात मोठे आहे. तर मग मानवतेच्या सुरक्षेसाठी आणि प्रेमापोटी घरात राहूनच पूजा, प्रार्थना करा. ही मंदिरे खुली करण्यासारखी सध्याची स्थिती नाही, असे न्यायालयाने म्हटले.

Web Title: COVID-19 situation not conducive to reopening of temples says Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.