मुंबई – एकीकडे राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून ठाकरे गटाला फटका बसलेला असताना आता दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावला आहे. किशोरी पेडणेकर यांना बुधवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.
किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने बजावले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात २ तास चौकशी केली होती. या कथित फसवणुकीची रक्कम ४९.६३ लाख इतकी असून याप्रकरणी ईडी आणखी काही जणांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात होती मात्र, किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यासाठी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच, ११ सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या परंतु याच प्रकरणी आता ईडीने पेडणेकरांना समन्स बजावले आहे.
काय आहे प्रकरण?
कोरोनाकाळात पालिकेने मोठ्या प्रमाणावर बॉडी बॅगची खरेदी केली होती. त्यांची किंमत १५०० रुपये असतानाही खरेदी ६७०० रुपये दराने झाल्याचा आरोप आहे. २०२० मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशाने पालिका अधिकाऱ्यांनी १२०० बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. वाढीव भावाने खरेदी केलेल्या या सामानातील काही टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगाने तपास होत आहे.