मुंबई : मुंबईत महापालिकेच्या शाळा सुरू होऊन १० दिवस उलटले आहेत. शाळा सुरू करताना शहरातील विलगीकरण आणि लसीकरणासाठी दिलेल्या शाळा रिकाम्या कराव्यात. त्यांचे निर्जंतुकीकरण करून दैनंदिन पद्धतीने वर्ग भरविले जावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, आजही महापालिकेच्या सुमारे २८ शालेय इमारतींचा वापर कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्रांसाठी होत आहे. पालिका शिक्षण विभागाकडून या इमारतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याची, तसेच पर्यायी व्यवस्था उभी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची इच्छा असूनदेखील त्यांना जाता येत नाही, अशी काहीशी परिस्थिती झाली आहे.
मुंबई पालिकेच्या प्रत्येक इमारतीत काही ठिकाणी १, तर काही ठिकाणी २ ते ३ शाळा चालविल्या जातात. इमारत पूर्णपणे कोविड लसीकरण केंद्र किंवा विलगीकरण कक्ष म्हणून वापरत नसल्या तरी आजूबाजूच्या परिसरात ये- जा नको म्हणून सर्व वर्गखोल्या आणि शाळा बंद ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक इमारतीत कमीत कमी ४०० किंवा त्याहून अधिक विद्यार्थी संख्या असल्याने महापालिकेचे सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणच घ्यावे लागत आहे. यासंबंधी पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या शाळा लवकर सुरू केल्या जाव्यात आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये बोलावले जावे, अशी मागणी पालक करीत आहेत.
सद्य:स्थिती पाहता लसीकरणाला प्राधान्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व इमारतींमध्ये महापालिका विभागाकडूनच लसीकरण केंद्रे सुरू आहे. त्यामुळे लसीकरणही सुरू राहील आणि विद्यार्थ्यांना वेगळ्या मार्गाने प्रवेश देण्याची स्वतंत्र व्यवस्थाही करता येईल, अशा पर्यायी मार्गांवर सद्य:स्थितीत काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात यावर तोडगा काढून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. - राजू तडवी, शिक्षणाधिकारी
महापालिका शाळांच्या एकूण शाळा : ११५९ एकूण इमारती : ४५० एकूण विद्यार्थी : २,९२,००० कोविड सेंटर म्हणून वापरात असणाऱ्या इमारती : ०३कोविड लसीकरणासाठी वापरात असणाऱ्या इमारती : २५