ठाण्यातील कोविड सेंटरचा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:18 PM2020-08-26T18:18:33+5:302020-08-26T18:18:52+5:30
एमएमआरडीएचे मुंबई ठाण्यासाठी वेगळे निकष
मुंबई : बीकेसी येथे दोन कोविड रुग्णालयांसाठी झालेला ५४ कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिकेने अदा करावा अशी भूमिका घेणा-या एमएमआरडीएने ठाण्यातील कोविड सेंटरसाठी केलेला ५ कोटी १२ लाख रुपये खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारने द्यावी असा निर्णय घेतला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर एमएमआरडीएने बीकेसी येथे प्रत्येकी एक हजार खाटांची दोन रुग्णालये उभारली. त्यासाठी ५४ कोटी १४ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर, ठाण्यातील ग्लोबल इम्पँक्ट हबच्या इमारतीत उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयासाठी एमएमआरडीएने ५ कोटी १२ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचा पुरवठा केला आहे. आरोग्य सेवा पुरविणे हे आमचे नव्हे तर पालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगर पालिका अधिनियम, १९८८ ते कलम ६१ (जी) (जीजी) अन्वये या खर्चाची प्रतिपूर्ती किंवा समायोजन मुंबई महापालिकेने करावी असा निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत झाला आहे. तर, याच बैठकीत ठाणे रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि साहित्यासाठी झालेला खर्चाची प्रतिपूर्ती ठाणे पालिकेने नव्हे तर राज्य सरकारने करावी या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
स्थापत्य कामांवर सर्वाधिक खर्च : बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या दोन रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साधनसामग्री, विमा, आयटी उपकरणे आणि अन्य सबंधित साहित्यासाठी १८ कोटी ३७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर, स्थापत्य कामे आणि विद्यूत उपकरणांसाठी ३५ लाख ७६ हजार रुपये खर्च झाला आहे. रुग्णालयासाठी मैदानाचे सपाटिकरण, मलनिःसारण कामे, पर्जन्यवाहिन्यांची कामे आणि पदपथांसाठी झालेला खर्च ६ कोटी ८५ लाख रुपये आहे.
वैद्यकीय सामग्री राज्य सरकारकडे : बीकेसी येथील कोरोना रुग्णालयांची आवश्यकता संपल्यानंतर तिथली वैद्यकीय सामुग्री आणि उपकरणे राज्य सरकारकडे हस्तांतरीत केली जातील. तर, इलेक्ट्राँनीक उपकरणे प्राधिकरण वापरणार आहे. या रुग्णालयांसाठी दैनंदिन संचलानासाठी आवश्यक असलेल्या वीज व अन्य खर्चाला महानगर आयुक्त आपल्या अधिकारात मंजूरी देणार आहेत.